चाळीसगाव : प्रतिनिधी
घरगुती वापरासाठी असलेले ३५ गॅस सिलिंडर अवैधरीत्या विक्रीसाठी नेत असलेल्या वाहनावर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. १६ मे रोजी सकाळी १० वाजता तरवाडे शिवारात मालवाहू वाहन (एमएच १९ सीवाय ०४६०) या वाहनातून हे सिलिंडर मिळाले.
यासंदर्भात सविस्तर अहवाल तहसीलदार व एचपीसीएलच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. या कारवाईमुळे गॅसच्या काळाबाजारप्रश्नी खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पो.हे.कॉ. ओंकार सुतार व गोवर्धन बोरसे यांनी ही कारवाई केली. गाडी थांबवून तपासणी केली असता एच.पी. गॅस कंपनीचे ३५ सीलबंद आणि १ रिकामा सिलिंडर आढळून आला. सिलिंडर घेऊन जाणाऱ्या वाहनाचा चालक विजय दिनकर दसेगावकर (रा. वृंदावननगर, चाळीसगाव) याच्याकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याने गाडी आणि सिलिंडर जप्त करण्यात आले.