मुक्ताईनगर : प्रतिनिधी
शहरातील बसस्थानकावरुन सोन्याचे दागिने ठेवलेली पर्स लांबविणाऱ्या महिलांच्या टोळीला पोलिसांनी काही वेळातच अटक केली.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील सुकळी येथील रहिवासी सरलाबाई जिजाबराव पाटील आणि त्यांचे पती जिजाबराव पाटील हे १५ रोजी दुपारी बाराच्या दरम्यान मुक्ताईनगर बसस्थानकात येऊन कुन्हा बसमध्ये चढत असताना गर्दीमध्ये पाच ते सहा अनोळखी महिला चढण्यासाठी धक्काबुक्की करत होत्या. त्यांपैकी एकीने सरलाबाईजवळील पर्समधील सोन्याचे दागिने पर्ससह लंपास केले. हे लक्षात येईपर्यंत त्या पाच-सहा महिला बसस्थानकातून पसार झाल्या होत्या. चोरी झाल्याने सरलाबाई रडू लागल्या. तेवढ्यात त्या ठिकाणी प्रमोद सौंदळे हे पोहोचले व झालेला प्रकार त्यांनी सौंदळे यांना सांगितला.
सौंदाळे यांनी तत्परता दाखवत भ्रमणध्वनीवरून पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांना झाल्या प्रकाराची माहिती दिली. तत्काळ मोहिते यांनी सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र चाटे तसेच पोलिस हे. कॉ. महेद्र सुरवाडे, पो. कॉ. गोविंद पवार, महिला पो. कॉ. सुवर्णा पाटील यांना सूचना करत बसस्थानकात पाठवले. पोलिसांनी बसस्थानकात सरलाबाई तसेच इतरही महिला प्रवाशांना विचारणा करून चाटे यांनी महेंद्र सुरवाडे यांना बोदवड चौफुलीकडे जाऊन महिलांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. त्या ठिकाणी काही महिला आहेत, असे सुरवाडे यांनी चाटे यांना भ्रमणध्वनीवरून कळवले. लागलीच पथक बोदवड चौफुलीवर पोहोचले. या महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांच्याजवळ सरलाबाई पाटील यांची चोरीला गेलेली पर्स आढळली. पर्स हस्तगत करून सर्व महिलांना अटक करण्यात आली.