रावेर : प्रतिनिधी
गेल्या 26 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी रावेर तालुक्यातील झुरखेडे येथील ग्रामस्थांनी गुरुवारी (दि.15) रोजी तापी नदीच्या पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन छेडले. मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी शांततेत आंदोलन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
जलसमाधी आंदोलनात शंभरहून अधिक शेतकरी, महिलांचा मोठा सहभाग होता, तर काही वयोवृद्ध नागरिकांनीही उपस्थिती लावली. हातात फलक घेऊन नदी पात्रात उतरलेल्या ग्रामस्थांनी “जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही” अशी ठाम भूमिका घेतली.
दरम्यान, आंदोलनादरम्यान चार नागरिकांना भोवळ आल्याने क्षणभर तणाव निर्माण झाला. त्यापैकी एकाची प्रकृती बिघडल्याने त्याला तत्काळ रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, 26 वर्षांपूर्वी पुनर्वसन योजनेला मंजुरी मिळाली होती. मात्र, आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पावसाळ्यात गावात पुराचा मोठा धोका असल्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात येते. त्यामुळे त्वरित पुनर्वसन व्हावे, ही त्यांची मुख्य मागणी आहे.
“आमच्या घरांचे पुनर्वसन झालेले नाही. वर्षानुवर्षे आम्ही केवळ आश्वासनांवर जगतो आहोत. यापुढे प्रशासनाने थेट कारवाई करावी. जिल्हाधिकारी स्वतः घटनास्थळी येऊन निर्णय घेईपर्यंत आम्ही नदीबाहेर पडणार नाही,” असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व महसूल विभागाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, ग्रामस्थ आपली मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. प्रशासनाने अद्याप ठोस भूमिका घेतलेली नसल्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाची धावपळ सुरू झाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परिस्थिती हाताळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता जिल्हा प्रशासन या दीर्घकालीन प्रश्नावर कधी आणि कशी दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.