चाळीसगाव : प्रतिनिधी
शांताबाई या फेसबुक अकाउंटवर बदनामी केली व ३० हजारांची खंडणी घेतल्याप्रकरणी शांताबाई अकाउंटधारकासह दोघे व अन्य साथीदारांविरोधात १४ मे रोजी चाळीसगाव शहर पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शेख अजीज शेख बशीर खाटीक यांच्या फिर्यादीवरून १४ मे रोजी शांताबाई अकाउंटधारक रणजितकुमार सुदेश दरोडे व मुराद पटेल (दोघे रा. चाळीसगाव) व इम्रान शेख (रा. मेहुणबारे) यांच्या व इतर साथीदारांविरोधात चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘शांताबाई’ या नावाने फेसबुक अकाउंटवर समाजातील प्रतिष्ठित लोकांची बदनामी व त्यांच्यावर चिखलफेक केली जात होती. हिंगोणे येथील माध्यमिक शिक्षक शेख अजिज शेख बशीर खाटीक यांच्या बाबतीतही शांताबाई या अकाउंटवर बदनामीकारक पोस्ट केली होती. त्यानंतर व्हिडीओ अपलोड करू, अशी धमकी देऊन वेळोवेळी पैशांची मागणी केली जात होती. त्या अनुषंगाने शांताबाईने मध्यस्थी मुराद पटेल यांच्यामार्फत फिर्यादीकडून २० हजार रुपये व १० हजार रुपये इम्रान शेख शब्बीर यांच्याकडून ऑनलाइन घेतले होते.