भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील काझी प्लॉट भागातील रहिवासी इकबाल पिंजारी व फरीद पिंजारी यांच्या घरातील लग्न कार्य असल्याने वन्हाड हे गुरुवारी बुलढाण्याकडे निघाले होते. यावेळी त्यांच्या घरात अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत घरातील टीव्ही फ्रीज, इलेक्ट्रिक समान आणि इतर साहित्य जळून सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पिंजारी यांच्या परिवारातील रजार या तरुणाचे लग्नकार्य असल्यामुळे सकाळी आठ वाजता वन्हाड बुलढाण्याकडे निघाले. यानंतर काही वेळातच त्यांच्या घरामध्ये शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीचा धूर पसरल्याने सभोवतालच्या नागरिकांनी त्वरित मदत कार्य केले. ही माहिती शेजारी राहणाऱ्या नाजीम याने पिंजारी यांना दिली. दरम्यान, पापा मेंबर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घरात प्रवेश करून सिलिंडरसह जे साहित्य वाचवता येईल ते वाचविण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दल येईपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र या अग्नी तांडवामुळे पिंजारी यांच्या घरातील संसाररोपयोगी वस्तू, तीस ते चाळीस हजार रुपये रोख व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. दरम्यान घरातील साहित्य खाक होत असताना पिंजारी कुटुंबीयातील अनेकांना अश्रू अनावर झाले होते. अनेकांनी त्यांना धीर दिला.