बीड : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतना आता दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार झाले. तर 4 जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि.१४) दुपारी अंबाजोगाई – आडस रोडवरील उमराई पाटी नजीक घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव तालुक्यातील पाथरूड येथून (एम एच 05 सी व्ही 9186) या कारमधून अंबाजोगाईकडे एका विवाह समारंभास उपस्थित राहण्यासाठी एक कुटुंब जात होते. आडस अंबाजोगाई रोडवरील उमराई पाटील नजीक असलेल्या दत्त मंदिरासमोर एक दुचाकीस्वार अचानक आडवा आला. या दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार जागीच पलटी झाली. यात शौकत अहमद शेख (वय ४६) व खय्युम अब्बास अत्तार (वय ४५) हे दोघे जागीच ठार झाले.
तर आरेफ जागीरदार, नवाब मिया शेख, वाजेद आबेद मोमीन, खाजा अमीर शेख, शरीफ इस्माईल मोमीन हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान ही घटना होताच दुचाकी स्वार आपल्या दुचाकीसह घटनास्थळावरून फरार झाला असून जखमीं पैकी आणखी एका जखमीची प्रकृती चिंताजनक होती . दरम्यान उपचारादरम्यान तिसऱ्या व्यक्तीचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे पाथरूड गावावर शोककळा पसरली आहे.