चाळीसगाव : प्रतिनिधी
‘शांताबाई’ या नावाने बनावट अकाउंट तयार करून चाळीसगावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाने बदनामी करणाऱ्या ‘शांताबाई’ फेम रणजीतकुमार दराडे तरुणाला अखेर नाशिक येथील पथकाने नुकतेच ताब्यात घेतले आहे. त्याला रसद पुरविणारे आता पोलिसांच्या रडारवर आहेत.
गेल्या एक-दीड वर्षापासून फेसबुक या सोशल मीडियावर ‘शांताबाई’ या नावाने अकाउंटद्वारे दररोज एक-दोन व्यक्तींवर चिखलफेक करून बदनामी केली जात होती. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी यांनी नाशिक येथील सायबर क्राइम ब्रँच यांच्याकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने तपासाअंती पोलिसांनी दराडे याला ताब्यात घेतले. त्याला माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ पुरविणारे आणि त्यावर प्रतिक्रिया देणारे कोण? याबाबत पोलिसांकडून चौकशी होत आहे. या चौकशीत त्याने काहींची नावे उघड केली असून, त्यांच्यापर्यंत पोलिसांचे हात लवकरच पोहोचणार आहेत. शांताबाई या सोशल मीडियावरील बनावट अकाउंटबाबत अनेक पदाधिकाऱ्यांनी शहर पोलिस स्टेशन व सायबर क्राइम ब्रँच, जळगाव यांच्याकडे यापूर्वी तक्रारी केल्या होत्या.