नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून भारत – पाकिस्तानचे वातावरण तापले असतांना चुकून पाकिस्तानच्या सीमेत गेलेले सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान कॉन्स्टेबल पी के साहू अखेर 20 दिवसांनी सुखरूप भारतात परतले आहेत. आज सकाळी 10:30 वाजता अटारी-वाघा सीमेवरून पाक रेंजर्सने त्यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले.
बीएसएफच्या निवेदनानुसार, 23 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11:50 वाजता, पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्युटीवर असताना कॉन्स्टेबल पी के साहू चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. त्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सने त्यांना ताब्यात घेतले.
या घटनेमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संवाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. अखेर दोन्ही देशांमध्ये संवादाच्या माध्यमातून कॉन्स्टेबल पी के साहू यांना सुरक्षित परत आणण्यात यश आले.
बीएसएफच्या सूत्रांनुसार, जवानाच्या परतीसाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू होते. जवानाच्या सुखरूप परतीमुळे कुटुंबीयांसह संपूर्ण दलात आनंदाचे वातावरण आहे. हा भारतासाठी एक सकारात्मक राजनैतिक संकेत मानला जात आहे.