पाचोरा : प्रतिनिधी
बालपणीच वडील मयत झाले. अवघ्या दहा महिन्यांपूर्वी आईचे दीर्घ आजाराने निधन झाले. असे आघात सहन करणाऱ्या येथील तरुणाचाही ११ रोजी अपघाती मृत्यू झाला. काळाचे हे क्रूर आघात येथील चौधरी (माळी) कुटुंबावर झाले.
सविस्तर वृत्त असे कि, दि.११ रोजी झालेल्या अपघातात मयत झालेल्या २५ वर्षीय तरुणाचे नाव अजय सुरेश चौधरी (माळी) असे आहे. आई आजारी होती म्हणून नोकरीला जाता आले नाही. तिची अजयने मनापासून सेवा केली. वडिलांच्या निधनानंतर अजय हा आईसोबत मामा श्रीकृष्ण भिवसने व दगडू भिवसने यांच्या छत्रछायेखाली वाढला. बारावीनंतर आयटीआय इलेक्ट्रिकल डिप्लोमा केलेला अजय चौधरी व गणेश गीते हे दोघे मित्र ११ मे रविवारी नाचनखेडा येथून लोहारा गावी येत असताना संतोषीमाता मंदिराजवळील रस्त्यावर खोदलेल्या नालीजवळ त्यांच्यात दुचाकीला अज्ञात वाहनाने रात्री आठ वाजेच्या सुमारास कट मारला. या अपघातात दोघे मित्र दुचाकीसह जमिनीवर आदळले व गंभीर जखमी झाले. उपचारासाठी दोघांनाही जळगाव येथे हलविण्यात आले. मात्र २४ तासांच्या उपचारात शस्त्रक्रिया करूनही दुसऱ्या दिवशी सायंकाळी अजय चौधरीची प्राणज्योत मालवली.