अमृतसर : वृत्तसंस्था
पंजाबमधील अमृतसरमध्ये विषारी दारू पिऊन १५ जणांचा मृत्यू झाला. तर ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मजीठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हे’ संपूर्ण प्रकरण अमृतसरमधील मढई गाव आणि मजिठा येथील भागली गावाचे आहे. ही घटना सोमवारी (१२ मे) रात्री घडल्याचे सांगितले जात आहे. सध्या पोलीस पथक त्या दारूचा स्रोत शोधत आहेत. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, रविवारी (११ मे) संध्याकाळी ही दारू एका ठिकाणाहून खरेदी करण्यात आली होती. त्यातील काही व्यक्तींचा मृत्यू सोमवारी सकाळीच झाला होता, मात्र पोलिसांना याची माहिती दिली गेली नव्हती. मृतांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
अमृतसर (ग्रामीण) एसएसपी मनिंदर सिंग यांनी सांगितले की, परिसरात विषारी दारू पिऊन १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर इतर सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. एसएसपी म्हणाले, “आम्हाला सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास माहिती मिळाली की विषारी दारू पिऊन लोक मरत आहेत. आम्ही ताबडतोब कारवाई केली आणि चार जणांना ताब्यात घेतले. आम्ही मुख्य पुरवठादार प्रभजीत सिंगला अटक केली आहे.” पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, चौकशीदरम्यान प्रभजीत सिंगने मास्टरमाइंड पुरवठादार साहब सिंगचे नाव सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की, “आम्ही त्यालाही पकडले आहे. त्याने ही दारू कोणत्या कंपन्यांकडून खरेदी केली याचा आम्ही तपास करत आहोत”. तसेच आम्हाला पंजाब सरकारकडून बनावट दारू पुरवठा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मिळाले आहेत. छापे टाकले जात आहेत आणि लवकरच दारू बनवणाऱ्यांनाही पकडले जाईल. याप्रकरणात दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. नागरी प्रशासन देखील यात सहभागी आहे आणि आम्ही घरोघरी जाऊन दारू पिणाऱ्यांची ओळख पटवत आहोत, जेणेकरून अधिकाधिक जीव वाचू शकतील. या घटनेमुळे पाच गावे प्रभावित झाली आहेत.