मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर यंदा उशीर न होता वेळेत मान्सूनची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच तयारी करून ठेवणे गरजेचे असल्याचे मत जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केले आहे. सोबतच राज्यात अवकाळी पावसाबाबत शेतकऱ्यांना सतर्क करत महत्वाच्या सूचना देखील केल्या आहेत.
राज्यात 12 मे ते 20 मे दरम्यान टप्प्याटप्प्याने मान्सूनपूर्व पावसाचे आगमन होणार आहे. हा पाऊस अगदी पावसाळ्यासारखा मुसळधार असेल. 12 मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन होईल. यावर्षी मान्सून साधारणतः 8 ते 10 दिवस लवकर दाखल होत आहे. 19 मे पर्यंत तो बेटांवर स्थिर राहील आणि 21 मे नंतर महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.
12 मे पासून अवकाळी पावसाचा धोका असून, 21 मेनंतर मान्सून सक्रिय होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी वेळेत योग्य पावले उचलून आपली पिके, बियाणे आणि साधने सुरक्षित ठेवावीत. या सकारात्मक मान्सून अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. परंतु त्याचबरोबर अवकाळी पावसाच्या तडाख्यापासून स्वतःचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे.