एरंडोल : प्रतिनिधी
मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी जात असताना, भरधाव वेगातील कार पुलाच्या भिंतीवर आदळून खाली कोसळल्याने चोपडा येथील दीपक अरुण मराठे (रा. मल्हारपुरा) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ८ मे रोजी रात्री ११ वाजता उमरदे गावाजवळ घडली. दीपक मराठे, पारस महाजन (रा. चोपडा) आणि मोहित नाथबुवा (रा.धरणगाव) हे तिघे त्यांच्या मित्र चेतन वानखेडे यांच्या बहिणीच्या हळदीसाठी बिलवाडी (ता. जळगाव) येथे चारचाकी क्रमांक एम.एच.१२ ए.एन.५३४६ ने निघाले होते.
सविस्तर वृत्त असे कि, एरंडोल-म्हसावद रस्त्यावरील उमरदे पुलाच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कार पुलाच्या कठड्यावर आदळून खाली कोसळली व उलटली. या अपघातात दीपक मराठे याचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर उमरदे गावातील स्थानिकांनी तत्काळ मदतीस धाव घेतली व जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एरंडोल पोलिस करत आहेत



