जळगाव : प्रतिनिधी
एप्रिल २०२५ च्या पहिल्या आठवड्यात जळगाव शहरात एका रात्रीत तीन महागड्या चारचाकी गाड्या चोरीला गेल्या होत्या. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. रामानंद नगर, जळगाव तालुका आणि जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात या चोरी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी एका धाडसी कारवाईत आंतरराज्यीय चारचाकी वाहन चोरणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. जळगाव एलसीबीच्या पथकाने बारकाईने तपास करून आरोपींचा मागोवा घेतला. आठ दिवस राजस्थानच्या वाळवंटात आणि जंगलात दबा धरून बसल्यावर आंतरराज्यीय वाहनचोर टोळी गजाआड करण्यात पथकाला यश आले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातून एकाच रात्रीत तीन चारचाकी चोरी झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. एलसीबीचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले, परंतु सुरुवातीला ठोस माहिती मिळाली नाही. त्यानंतर, बागल यांनी त्यांच्या गुप्त खबऱ्यांकडून माहिती मिळवली आणि मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण केले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलीस उपनिरीक्षक बागल यांनी तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह राजस्थान गाठले. त्याठिकाणी राज्यात जाऊन त्यांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याशी संपर्क करून जालोर (राजस्थान) जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी गुन्ह्यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले. मात्र, आरोपींकडून वाहनांविषयी कोणतीही माहिती मिळत नव्हती, त्यामुळे अधिक चौकशी करणे आवश्यक होते.
पोलीस उपनिरीक्षक शरद बागल आणि पोलीस हवालदार विजय पाटील हे राजस्थानमधील सांचोर येथे तळ ठोकून होते. हे ठिकाण वालुकामय आणि विरळ लोकवस्तीचे असल्याने चोरीची वाहने शोधणे अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक होते. अखेर, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे बागल आणि पाटील यांना माहिती मिळाली की, टोयाटो कंपनीची इनोव्हा क्रिस्टा गाडी सांचोरच्या जंगलात आहे. बागल आणि पाटील यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ती गाडी ताब्यात घेतली आणि फिर्यादीला फोटो पाठवले. फिर्यादीने ती गाडी आपलीच असल्याचे ओळखले. पोलीस उपनिरीक्षक शरद बागल आणि पोलीस हवालदार विजय पाटील यांनी जवळपास १००० किलोमीटर गाडी चालवत ती जळगावला आणली. पोलिसांनी गाडी आणि आरोपींना संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहा. फौजदार अतुल वंजारी, पोलीस हवालदार हिरालाल पाटील, पोलीस हवालदार विजय पाटील आणि चालक पोलीस शिपाई महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.