नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या आतंकी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर, भारताने पाकिस्तानवर हल्ला केलाय. आज सकाळी लवकर “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ ठिकाणी हवाई हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद मुख्यालय व मुरीदकेमधील लष्कर-ए-तैयबा मुख्यालय ही मुख्य लक्ष्य होती. हल्ल्याचे नियोजन इतके गुप्त होते की पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. भारतीय कारवाईनंतर पाकिस्तानने कराची व लाहोरचा एअरस्पेस बंद केला आहे. भारतातही सुरक्षा कारणास्तव श्रीनगर (SXR), जम्मू (IXJ), अमृतसर (ATQ), लेह (IXL) आणि धर्मशाळा (DHM) येथील विमानतळ पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहेत.
इंडिगो एअरलाइन्सने म्हटले की, “हवाई क्षेत्रातील बदलत्या स्थितीमुळे आमच्या अनेक उड्डाणांवर परिणाम झाला आहे.” स्पाईसजेटने देखील जाहीर केले की, “सध्याच्या परिस्थितीमुळे उत्तरेतील अनेक विमानतळ बंद करण्यात आले असून, प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाची योजना पुन्हा आखावी.”
UN महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी या लष्करी कारवाईबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी म्हटले की, “भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणताही लष्करी संघर्ष संपूर्ण जगासाठी घातक ठरू शकतो. दोन्ही देशांनी संयम पाळावा.” भारताच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी गटांवर केलेल्या निर्णायक कारवाईमुळे प्रादेशिक तणाव वाढला आहे. हवाई सेवा व प्रवाशांवर त्याचा मोठा परिणाम झाला असून, पुढील काही दिवस हे संकट कसे मार्गी लागते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.