नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यानी केलेल्या हल्ल्याचा सूड म्हणून केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. यात 100 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली. दरम्यान, या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू आहे, असे स्पष्ट केले.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या कारवाईनंतर केंद्र सरकारने गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावून विविध राजकीय पक्षांना या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) मधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करून त्यांचा पूर्ण नायनाट केला, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना बुधवारी सकाळी झालेल्या सैनिकी कारवाईची माहिती देण्यात आली. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना याची माहिती दिली.
रिजिजू म्हणाले, “सर्व नेत्यांनी परिपक्वता दाखवत सरकारला पाठिंबा दिला आहे. सर्वपक्षीय बैठक ही एकजुटीचे प्रतिक ठरली. सर्व पक्षांनी ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय सशस्त्र दलांचे अभिनंदन केले आणि या कारवाईस पाठिंबा दिला.”
त्यांनी यावेळी हेही स्पष्ट केले की, ऑपरेशन अजूनही सुरू असल्याने तांत्रिक तपशील किंवा पुढील टप्प्यांची माहिती सध्या उघड केली जाणार नाही. “हे सुरू असलेले ऑपरेशन असल्यामुळे, अधिकाऱ्यांना बैठकीस बोलावले गेले नाही,” असेही रिजिजूंनी स्पष्ट केले.
“देशात व देशाबाहेरून अनेक खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यामुळे सर्व पक्षांनी आणि नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा,” असे आवाहन रिजिजूंनी केले.