जळगाव : प्रतिनिधी
ज्याच्यासोबत लग्न ठरले तो तरुण पसंत नसल्याने विवाह मुहूर्त चार दिवसांवर आलेला असताना उपवर तरुणी पसार झाली. ऐनवेळी या तरुणीच्या लहान बहिणीचे उपवर तरुणाशी लग्न लावून देण्यात आले. पसार झालेली तरुणी कॉलनीत कामानिमित्त आलेल्या तरुणासोबत गेल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकार शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात नुकताच घडला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक तरुण कामानिमित्त शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात नातेवाईकांकडे राहण्यासाठी आला होता. या तरुणाचे तो राहत असलेल्या परिसरातील एका २० वर्षीय तरुणीशी प्रेम जुळले. मध्यंतरी दोघेही घर सोडून पसार झाले होते. मात्र, नंतर ते जळगावात परतले. त्यावेळी सदर तरुणीचे दुसऱ्या एका मुलासोबत लग्न ठरवले. मात्र तो मुलगा या तरुणीला पसंत नव्हता. लग्नाची सर्व तयारी जोरात सुरू झाली व घरासमोर मंडपही टाकला गेला. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी शहर पोलिस ठाण्यात मुलगी हरविल्याची फिर्याद दिली आहे. त्यावरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ विरेंद्र शिंदे करत आहेत.
मुलीचे लग्न ठरले असल्याने आई-वडील लग्नाच्या खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी ही तरुणी मंडपातून गायब झाली. ती न दिसल्याने घरी असलेल्या सदस्यांनी तिच्या आई-वडिलांना कळवले. यानंतर ते घरी आले व मुलीचा शोध घेतला. मात्र, मुलगी काही सापडली नाही. अखेर लग्न घटिका जवळ आल्याने या तरुणीच्या लहान बहिणीचे उपवराशी लग्न लावून देण्यात आले. दुसरीकडे या परिसरात राहण्यासाठी आलेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तरुणही गायब असल्याने ती त्याच्यासोबतच पळून गेल्याचा संशय बळावला.