जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ,मोहोपाडा-रसायनी शाखा,ग्रुप ग्रामपंचायत मोहोपाडा व अक्षर मानव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.०६मे २०२५ रोजी मोहोपाडा ग्रामपंचायत हाॅलमध्ये ‘तिच्या मनाचिये गुंती’ हा संवाद कार्यक्रम पार पडला. ग्रामपंचायत अधिकारी(ग्रामसेवक)वैभव पाटील यांचे हस्ते दिव्यात पाणी भरून शास्रीय पद्धतीने दीप प्रज्ज्वलन करून प्रारंभ करण्यात आला. ग्रामपंचायत अधिकारी वैभव पाटील आणि लोकमतचे पत्रकार बाळासाहेब सावर्डे यांचा कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ( मोहोपाडा रसायनी ) आणि अक्षर मानव ग्रंथालय अध्यक्ष रोहिदास कवळे यांच्या हस्ते पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.
संवादक आरती नाईक ( राज्य कार्यवाह महिला विभाग महा. अंनिस) यांनी स्रीचा शरीर धर्म(मासिक पाळी),शारीरिक,मानसिक बदल आणि समजूतींचा गोंधळ,त्यातून कुटुंबात निर्माण होणारा विसंवाद,स्रीची प्रजनन संस्था,नवीन जीव निर्मीतीत स्रीचे महत्व,तिचे कष्ट तसेच मासिक पाळीच्या वेळी कशी स्वच्छता ठेवावी, त्यासाठी वापरली जाणारी साधने आणि वापरून झाल्यावर नष्ट ( डिस्पोजल) कशी करावी व मासिक पाळी जातानाची ( मेनोपॉज) काळजी यांचा स्लाईड शोद्वारे शास्रीय माहितीच्या आधारे साधलेला संवाद सर्वांनाच भावला. महिला व पुरूषांसाठी असलेल्या या संवाद कार्यक्रमास २१महिला व ०५ पुरूषांनी हजेरी लावली.यावेळी महाराष्ट् अंधश्रद्धा निर्मूलन समिती मोहोपाडा-रसायनी आणि अक्षर मानव ग्रंथालय विभाग अध्यक्ष महाराष्ट्र चे रोहिदास कवळे,संवादक आरती नाईक राज्य महिला विभाग कार्यवाह,महाराष्ट्र अंनिस. ग्रामपंचायत प्रतिनिधी म्हणून कर्मचारी अस्मिता मालकर,स्नेहा खाने,दीपाली मानकामे उपस्थित होत्या तर सारिका कांबळे,वर्षा पाटील यांचीही उपस्थिती होती .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदरणीय सरपंच उमाताई मुंढे यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधूरीताई कांबळे यांनी केले. या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र नाईक, प्राजक्ता कवळे ( कार्यवाह महिला सहभाग महा. अंनिस, मोहोपाडा रसायनी) कुणाल जाधव ( प्रधान सचीव महा. अंनिस, मोहोपाडा रसायनी) आणि इतर कार्यकर्त्यांनी खूप खूप मेहनत केली.