पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरु झाला असून ज्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळाला परंतु पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. अचानक झालेल्या पावसानंतर हवामान खात्याने आज मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार बुधवारी दुपारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला.
चक्रीवादळ वारे दक्षिण तेलंगणा आणि जवळच्या प्रदेशांवर परिणाम करत आहेत. तामिळनाडू पासून मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा पसरला आहे, ज्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडत आहे. हवामान खात्याने पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, जालना आणि बीड येथे मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता असल्याने अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अवकाळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला.
दरम्यान, मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग (कोकण), नंदुरबार, धुळे, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर (मध्य महाराष्ट्र) व मराठवाड्यात वादळ येण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहत आहेत, मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात, विशेषतः जिल्ह्याच्या पश्चिम भागात घरांचे नुकसान झाले आहे, तर पूर्व भागात हलका पाऊस पडला आहे.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील तापमान कमालीचे वाढले होते. उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यात आता हवामानात बदल झालेला दिसत आहे. अनेक भागांमध्ये पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळत आहे. थंड हवा वातावरणात पसरली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या पिकांचे मात्र नुकसान होत आहे.