जळगाव : प्रतिनिधी
मामाच्या मित्राशी ओळख करीत त्यांच्याकडील मोबाइल अॅपद्वारे परस्पर कर्ज घेऊन दोन मोबाइल घेत ५८ हजार ६०५ रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. वित्तपुरवठा कंपनीकडून कर्जाच्या हप्त्यासाठी कॉल आल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी नासीर शेख निसार (२०, रा. नाशिक) याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शाहरुख शेख नजीर (३२, रा. शाहूनगर) यांची त्यांच्या मित्राचा भाचा नासीर शेख याच्याशी ओळख झाली. त्यामुळे नासीर हा शाहरुख यांच्या खाद्यपदार्थांच्या गाडीवर येऊन बसायचा. दररोज गप्पा मारून त्याने विश्वास संपादन केला व विक्रेत्याचा मोबाईलही वापरू लागला. त्यादरम्यान त्याने २१ फेब्रुवारी व २५ फेब्रुवारी रोजी मोबाईलद्वारे ऑनलाईन व्यवहार केले. त्यात खासगी वित्तपुरवठा कंपनीकडून कर्जाद्वारे ३५ हजार ५४७ रुपये व व २३ हजार ५८ रुपये असे एकूण ५८ हजार ६०५ रुपयांचे दोन मोबाईल परस्पर घेतले.