जळगाव : प्रतिनिधी
उन्हाळी सुट्यांमुळे कुटुंबीय महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी गेलेले असताना अजय प्रकाश छाडीकर (रा. राम नगर) यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अडीच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह आठ ते १० हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. त्याच रात्री आरटीओ कार्यालयाजवळील आणि काव्यरत्नावली चौकातील दूध केंद्र फोडून चोरट्यांनी महागड्या चॉकलेट, बिस्कीटसह चिल्लर चोरुन नेली. एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्याने रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त असते की नाही, याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मिनी स्कूल बसचालक असलेले अजय छाडीकर हे उन्हाळी सुट्यांमुळे ३० एप्रिल रोजी कुटुंबासह महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी गेले होते. ४ मे रोजी त्यांचा भाचा झाडांना पाणी देण्यासाठी छाडीकर यांच्या घरी गेला. यावेळी त्याला घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्याने ही माहिती मामांना कळविली. घरात पाहणी केली असता चोरट्यांनी कपाटातील अडीच तोळे सोन्याचे दागिने आणि आठ ते १० हजारांची रोकड चोरुन नेली.
छाडीकर यांच्या घरात चोरी केल्यानंतर चोरट्यांनी आरटीओ कार्यालयाच्या गेटजवळ असलेल्या दूध केंद्राचे कुलूप तोडले. मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यानंतर चोरट्यांनी काव्यरत्नावली चौकातील दूध केंद्राचे कुलूप तोडून महागड्या चॉकलेट, बिस्कीटांसह १० ते १५ हजार रुपयांची चिल्लरदेखील चोरुन नेली.