पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील परधाडे ते पाचोरा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांजवळ एकाच कुटुंबातील तिघांचे छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या मृतांमध्ये एका पुरुषासह एक महिला आणि सुमारे तीन वर्षांचा चिमुकला यांचा समावेश आहे. ही भीषण घटना सोमवारी (दि.5) उघडकीस आली.
या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिघांचे मृतदेह पाहणी करून तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही कुटुंबाने जीवनयात्रा संपवल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, अद्याप या तिघांची ओळख पटलेली नाही. ते कोणत्या गावातील आहेत, हेही अस्पष्ट आहे. त्यामुळे पाचोरा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित तिघांबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. विशेषतः चिमुकल्याचा मृतदेह पाहून अनेकांचे डोळे पाणावले. पोलीस अधिक तपास करत असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.