रावेर : प्रतिनिधी
रावेर ते सावदा रस्त्यावरील बिंबे पेट्रोल पंपाजवळ बस व दुचाकीच्या २७रोजी झालेल्या अपघातात दुचाकीवरील तांदलवाडी येथील दोघे जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जळगाव येथे रवाना केले होते. यातील दुचाकीमागे बसलेले विजय तुकाराम पाटील (वय ५३) यांच्यावर मुंबईत खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी मृत्यू झाला.
विवरे गावाकडून रावेरकडे येणारी बस (एमएच- २०, बिएल ३००६) ही २७ रोजी रावेर ते सावदा रस्त्यावरील बिंबे पेट्रोल पंपाजवळ आली. या वेळी दुचाकी स्वार पंपावर पेट्रोल भरून रस्त्यावर येत असताना बस व दुचाकी यांच्यात अपघात झाला होता. यात तांदलवाडी येथील सार्थक विजय पाटील (वय २०) व विजय तुकाराम पाटील (वय ५३) हे जखमी झाले होते. अपघातानंतर जखमींना रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले होते. तर दुचाकीवर मागे बसलेले विजय पाटील हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा ३ रोजी मृत्यू झाला. रविवारी त्यांच्यावर राहत्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.