पुणे : वृत्तसंस्था
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. निकाल जाहीर होण्याआधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख भावुक झाली.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यभरात संतापाचे वातावरण होते. वडिलांच्या हत्येनंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संतोष देशमुखांची कन्या वैभवी मोठ्या हिमंतीने लढत आहे. या कठीण परिस्थितीतही वैभवीनं बारावीची परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
संकट काळात वैभवीने अभ्यास करुन बारावीमध्ये 85.33 टक्के गुण मिळवले आहेत. निकालाआधी माध्यमांशी संवाद साधत वैभवी म्हणाली की, ‘माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला आज माझे वडील नाहीत. माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगला लागेल.’ निकालाआधी वैभवीने वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतंल. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे देशमुख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. “आज पाच महिने झाले तरी देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच एक आरोपी अद्यापही फरार आहे, त्याला देखील अटक केली जावे,” अशी मागणी वैभवी देशमुख हिने यावेळी केली.