जळगाव : प्रतिनिधी
आपल्याच घरातून बाहेर आल्याच्या संशयावरून राजेंद्र हरिचंद्र सपकाळे (४०, रा. समता नगर) यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्याने दगडाने मारहाण केली. ही घटना ३ मे रोजी समता नगरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे.
सेंट्रिंग काम करणारे राजेंद्र सपकाळे हे नळाला पाणी आल्यामुळे मोटार लावत होते. शेजारच्या दाराजवळ असलेला कॉक सुरू करण्यासाठी तेथे गेले. त्यावेळी सपकाळे हे आपल्याच घरातून बाहेर आले असा संशय शेजारी राहणाऱ्यास आला. या कारणावरून सपकाळे यांना गच्चीवरून दगड मारून फेकले. यामुळे त्यांच्या पाठीवर आणि हातावर दुखापत झाली. याचा जाब विचारला असता त्यांना मारहाणही करण्यात आली. याप्रकरणी राजेंद्र सपकाळे यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नीलेश पाटील करीत आहेत.