भुसावळ : प्रतिनिधी
शहरात २३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जळगावचे डीवायएसपी संदीप गावित व त्यांच्या टीमने ही कारवाई केली. या प्रकरणात अटकेतील तिघांना न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शाहूनगरात शहर पोलिस ठाण्याने टाकलेल्या धाडीत ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. यामधील मुख्य आरोपी सरफराज याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीत याकुब याचे नाव समोर आले. त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. जळगाव येथे आल्यावर त्याला अटक करून चौकशी केली असता, भुसावळ येथील अन्सार भिस्ती, वसीम खान यांची नावे समोर आली. वसीम खान याच्या घराची झडती घेतली असता, घरात २३ ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले. ही कारवाई २ मे रोजी रात्री सुरू झाली व ३ मे रोजी पहाटे ३ वाजता आटोपली.
या कारवाईमध्ये डीवायएसपी संदीप गावित, शहर पोलिस ठाण्याचे एपीआय नाईक, रीडर गायकवाड व इतर कर्मचाऱ्यांसह फॉरेन्सिकची घटनास्थळी उपस्थित होती. जळगाव व भुसावळ शहरांत एमडी ड्रग्ज मोठ्या प्रमाणात आपले पाय फोफावत असल्याचे दिसून आले आहे. भुसावळ शहरामध्ये बाजारपेठ हद्दीमध्ये एमडी ड्रग्ज यापूर्वीही पकडण्यात आले होते.