लाईव्ह महाराष्ट्र विशेष : खान्देशवासियांनो जळगाव, धुळे आणि नंदुरबार या आपल्या खान्देशात उन्हाची तीव्रता राज्यात सर्वाधिक जाणवते. त्यातल्या त्यात आपल्या जळगाव जिल्ह्याचा पारा हा मे महिन्यात तर चाळीशी ओलांडून ४७ ते ४८ अंशांवर तापमान जाऊन पोहचते . आतातर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने ४४ अंशांची पातळी गाठली असल्याने उन्हाच्या तीव्र झळा सकाळपासून ते सायंकाळी ७ वाजे दरम्यान जाणवत आहे. बाहेर पडणेही कामानिमित्त असह्य झाले आहे. या तीव्र उन्हापासून आपला आणि आपले कुटुंबीयांचा बचाव करणे अधिक महत्वाचे आहे.
तप्त दुपार आणि गरम हवा शरीरावरही परिणाम करतेच. त्यामुळे उन्हाळा आल्यानंतर तुमच्या जेवणाच्या दिनचर्येतही बदल गरजेचा आहे.
उन्हाळ्यात अधिक तेलकट खाणे नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे संतुलित आहाराची आवश्यकता असते. दिवसाची सुरुवात एक लीटर पाणी किंवा लिंबू पाण्याने करा. दिवसभर जास्तीत जास्त पाणी पिणेही आवश्यक असते.
ऋतूनुसार आपल्या आहारात बदल आवश्यक आहे. थंडीत शरीरात उष्णता उत्पन्न करणार्या पालेभाज्या, फळे तर उन्हाळ्यात पचनासाठी हलके-फुलके खाद्यपदार्थ, फळे आणि पेय पदार्थ निसर्गापासून आपल्याला मिळतात. त्यात टरबूज, काकडी, खरबूज, द्राक्षे, लिंबू, स्ट्रॉबेरी, सफरचंद, आंबे ही फळे आहेत.
या सर्वांमुळे फक्त शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते असे नाही तर शरीराला थंड बनवून पोषणही देतात. त्यातून मिळणारे व्हिटॅमिन्स् आणि खनिजे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवितात आणि त्वचेलाही सुंदर बनवितात. यांचा वापर कच्चे सलाड किंवा ज्यूसच्या रूपात किंवा काही शिजवून (काकडी, कोबी) खाऊ शकतो. त्याव्यतिरिक्त उन्हाळ्यात रॉक सॉल्ट (खनिज मीठ), जिरे, शोप, वेलची हे मसाले तसेच दही, कैरीचे पन्हे, पुदिना, बेलच्या फळाचा रस, सरबते, चटणी, जलजीरा या वस्तूही शरीरासाठी अनुकूल असतात.
उन्हाळ्यातील आहार- उन्हाळ्यात पचायला हलका व लघु आहार घ्यावा. उन्हाळ्यात वात व पित्तदोषाची वृद्धी होत असते त्यामुळे या काळात वातुळ, पचायला जड, तिखट तसेच जास्त गरम आहार टाळावा. मुगाची खिचडी किंवा वरण तसेच सर्व पालेभाज्यांचं प्रमाण आहारात वाढवावं. उन्हाळ्याच्या दिवसांत जास्तीत जास्त द्रवाहार करावा. फ्रीजमधलं अतिथंड पाणी पिण्यापेक्षा मटक्यातील सौम्य थंड पाणी प्यावं. लोणी, श्रीखंड, मावा, दही, पनीर, लस्सी शक्यतो टाळावं. मद्यसेवन पूर्ण वर्ज्य करावं.
याकडे द्या लक्ष
◆ सकाळी-सकाळी किंवा संध्याकाळी व्यायामासाठी नक्की वेळ काढा.
◆ घरातून बाहेर निघताना सनस्क्रीन लोशन लावा. स्कार्फ, समर कोट घालूनच बाहेर जा. पाणी जास्त प्रमाणात प्या.
◆ डोळ्यांना सूर्याच्या किरणांपासून बचावासाठी चांगल्या क्वालिटीचे सन ग्लासेस वापरा.
◆ बाहेर पडताना पाण्याची बॉटल शक्यतोवर सोबत असू द्या. त्यात ग्लूकोज किंवा लिंबू पाणी मिळवा.
◆ कॉटनच्या हलक्या रंगाच्या कपड्यांना प्राधान्य द्या.
उष्माघाताची लक्षणे
ताप येणे
डोके दुखणे
डोळ्यांची आग
तहान लागणे
घरगुती उपाय
थंड पाण्याचा वापर
कांद्याचा रस तळपायाला लावणे
लिंबू-पाणी अधिकाधिक पिणे
उन्हात घराबाहेर पडू नये