बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बाहेर आल्यानंतर आता पुन्हा एकदा एक खळबळजनक घटना घडली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. करुणा शर्मा यांनी ऑक्टोबर 2020 पासून पोटगीची 60 लाखांची थकबाकी धनंजय मुंडे यांनी द्यावी यासाठी वांद्रे कोर्टात तीन अर्ज दाखल केले आहेत. तसेच धनंजय मुंडे यांच्याकडून धमक्या आणि छळ सुरूच असल्याची लेखी तक्रार करुणा शर्मा यांनी कोर्टात दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना, स्वतः धनंजय मुंडेंनी मला 18 तुकडे करण्याची धमकी दिली असल्याचे करुणा शर्मा यांनी सांगितले आहे. लव्ह जिहादपेक्षा जास्त माझ्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.
करुणा शर्मा म्हणाल्या, मला 2 लाख पोटगी मिळाली तेव्हापासून तसेच आमदारकी रद्द होणार अशी कोर्टाकडून नोटीस आल्यापासून मला धमक्या येत आहेत. स्वतः धनंजय मुंडेंनी मला 18 तुकडे करण्याची धमकी दिली आहे. माझ्याविरोधात अजूनही हिंसा सुरूच आहे. यासंदर्भात कोर्टात तक्रार दिली आहे. व्हॉट्सअप चॅट, एनसी देखील पुरावे कोर्टात दिले आहेत. पोलिसांकडे देखील तक्रार दाखल केली आहे, मात्र ते काही करत नाही.
पुढे बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, ते किती पाण्यात आहेत, हे मी दाखवून देणार आहे. एफआयआर करा असे मी सांगितले होते, पण काहीही केले नाही. मला संरक्षण द्यायला कोर्टात सांगितले आहे, मात्र अद्याप काही केले नाही. मुलीला घेऊन जाणार अशी मला धमकी दिली जात आहे. तसेच मी पोटगी संदर्भात कोर्टात याचिका लवकरात लवकर मिळावी अशी मागणी केली आहे. मी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे, त्यांनी वेळ दिला नाही. तरी मी मंत्रिमंडळ बैठकीला जाणार आहे आणि या संदर्भात त्यांच्याकडे तक्रार करणार आहे. लव्ह जिहादपेक्षा देखील अधिक जास्त माझ्यावर अन्याय होत आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
करुणा शर्मा यांनी दिलेल्या अर्जात काय म्हटले आहे?
माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे हे कोर्टाच्या आदेशांना न जुमानता आपल्याला दररोज धमक्या आणि एआयच्या माध्यमातून मॉर्फ केलेले व्हिडिओ आणि फोटो पाठवून आपला छळ करत असल्याची लेखी तक्रार करूणा शर्मा यांनी कोर्टाकडे केली आहे.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून आणि त्यांच्या लोकांकडून आपल्याला अजुनही धमक्या आणि आता एआयच्या माध्यमातून छळ सुरूच असल्याची तक्रार करूणा शर्मा यांनी कोर्टाकडे केली आहे. तसेच कोर्टानं पोटगीबाबत दिलेल्या आदेशांनुसार 60 लाखांची वसुली आणि करूणा यांच्या मालकीच्या संपत्तीची विक्री करू नये असे आदेश देण्याची मागणी करत करूणा शर्मा यांनी कोर्टात नव्यानं अर्ज केले आहेत.
कोर्टाच्या आदेशानंतरही धनंजय मुंडेंकडून धमक्या आणि छळ सुरूच. प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत धनंजय मुंडे यांनी करूणा शर्मा यांना कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये, असे कोर्टाचे स्पष्ट निर्देश असतानाही धनंजय मुंडे आणि त्यांच्या लोकांकडून आपल्याला दररोज जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार करत करूणा शर्मा यांनी वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं नव्यानं अर्ज केला आहे. धमक्यांसोबत आपल्या मोबाईलवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तयार केलेले अश्लील व्हिडिओही पाठवले जात असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
ज्या व्हीडिओ आणि फोटोत आपण नाही, तरीही त्यात आपणं असल्याचं दाखवून आपला मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप करूणा मुंडे यांनी केला आहे. तसेच कोर्टानं दिलेल्या आदेशांनुसार दर महा 2 लाख रूपये या हिशोबानं साल 2022 पासून आपण आजवर 60 लाख रूपये पोटगीस पात्र असल्यानं त्याची कोर्टानं धनंजय मुंडे यांच्याकडून वसुली करावी अशी मागणीही करूणा शर्मा यांनी कोर्टाकडे केली आहे. तसेच आपल्या नावावर असलेल्या मालमत्तांची विक्री करण्यापासून मज्जाव करण्याचे आदेशही कोर्टानं जारी करावेत अशी मागणी करत तीन स्वतंत्र अर्ज करूणा शर्मा यांनी आपले वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत कोर्टापुढे केले आहेत.