ठाणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी धक्कादायक घटना घडत असतांना आता थरकाप उडविणारी घटना ठाणे येथील भिवंडीतून समोर आली आहे. शनिवारी एका महिलेसह तिच्या तीन मुलींचे मृतदेह गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. पती नाईट शिफ्ट संपवून कामावरून सकाळी घरी परतला असता त्याला पत्नीसह मुलींचे मृतदेह पंख्याला लटकलेले दिसून आले. या दृश्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत महिलेचे वय 32 वर्षे होते, तर तिच्या मुलींचे वय हे 4 वर्षे ते 12 वर्षे दरम्यान होते. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही चौकशी करत आहोत. आत्महत्या आहे की घातपात याचा तपास सुरू आहे. तसेच महिलेने मुलींसोबत एकत्र गळफास घेतला की आपण आत्महत्या करण्याआधी मुलींची हत्या केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मृत महिलेचे नाव पुनीता बनवारीलाल भारती असे आहे, तर तिच्या मुलींची नावे नंदिनी, नेहा आणि अनु अशी आहेत. ठाण्याच्या भिवंडी येथील फेने गावात एका चाळीत राहत होते. शुक्रवारी रात्री नाईट शिफ्टसाठी बनवारीलाल हे कंपनीत गेले होते. नाइट शिफ्ट करून ते सकाळी घरी परतले. घरी परतल्यावर त्यांना धक्काच बसला. पत्नी आणि मुलींचे मृतदेह त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घरचा तपास केला. यावेळी त्यांना घटनास्थळी एक सुसाइडनोट आढळून आली. यात आपण मर्जीने आत्महत्या करत असून यात कोणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटले होते. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून रुग्णालयात शवविच्छेदनाठी पाठवले आहे. आता आत्महत्येचे कारण काय, याचा तपास केला जात आहे.