भडगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वाक येथे गाडीस मागून जोरदार धडक देत चालकासह अन्य तिघांवर तलवार, कोयता, लाकडी दांडकाने वार करत जीवघेणा हल्ला करत गंभीर जखमी केले आहे. यात एका जणांच्या डाव्या हाताच्या मनगटाची नस तुटली असून, एकाच्या डोक्यात लाकडी दांडका हाणून गंभीर जखमी केले. हा थरार शुक्रवारी रात्री घडला. याबाबत पोलिस ठाण्याला ४ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २ मे रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास राकेश पाटील हे वाक गावात उभे असताना योगेश कैलास पाटील, उमेश शालीक पाटील, सतीश शालीक पाटील, अक्षय बारकू पाटील, असे चारचाकी गाडी (एमएच४२/एयु४२४९) ने आले. गाडी चालवत असलेल्या योगेशने गाडीने ठोस मारली. या गाडीतील चारही इसम खाली उतरले. उमेश शालीक पाटील याने राकेश यांना धरून ठेवले. त्यानंतर हा हल्ला करण्यात आला. राकेश यांना वाचवण्यासाठी त्यांचे नातेवाईकही पुढे धावले. मात्र त्यांच्यावरही अशाच प्रकारे प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
योगेश कैलास पाटील याने गाडीतून तलवार काढत मानेवर, डाव्या हाताच्या मनगटावर वार करत जखमी केले, तेव्हा काका किशोर विक्रम पाटील व वडील सुधाकर विक्रम पाटील हे सोडविण्यास आले असता, योगेश पाटील याने त्याच्या हातातील तलवारीने किशोर पाटील यांच्या डोक्यावर वार केला. उमेश शालीक पाटील याने हातात लाकडी दांडकाने मारहाण केली. या भांडणात सतीश शालीक पाटील व अक्षय बारकू पाटील यांनी वेळोवेळी चिथावणी दिली. त्यानंतर तेथे काका सर्जेराव विक्रम पाटील, आई लिलाबाई सुधाकर पाटील, काकू जागृती किशोर पाटील, परमेश्वर सुधाकर पाटील यांनी लोकांच्या तावडीतून सोडवले. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे जात असताना त्यांनी गाडीला अडवण्याचा प्रयत्न केला. याबाबत राकेश सुधाकर पटील (२८, वाक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३,११८ (२), २८१ (३) ३५१ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. संजय पाटील हे करीत आहे.