जळगाव : प्रतिनिधी
घराचा व्यवहार होऊन बांधकाम व्यावसायिकास (बिल्डर) देण्यासाठी आणलेल्या दोन लाख ६५ हजार रुपयांसह १५ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी घरातून लांबविल्याची घटना १ रोजी रात्री सत्यम पार्क भागात घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेती व्यवसाय असलेले राजू जगन्नाथ साळवे (५८, रा. सत्यम पार्क, सोपान नगर) यांच्या घराचा व्यवहार झाला. त्यासाठी बिल्डरला देण्यासाठी त्यांनी दोन लाख ६५ हजार रुपये घरात ठेवले होते. या घराला कुलूप लावून साळवे कुटुंबीय घरात झोपले होते. मध्यरात्री चोरट्यांनी घरात असलेले रोख दोन लाख ६५ हजार रुपयांसह १५ हजार रुपयांचे सोन्याचे कानातील टॉप, साकळ्या चोरून नेल्या. साळवे कुटुंबीय सकाळी उठले त्यावेळी ही चोरी लक्षात आली. घराचा व्यवहार झाल्याने बिल्डरला देण्यासाठी साळवे यांनी आठ ते १० दिवसांपूर्वीच ही रक्कम आणून घरात ठेवली होती. मात्र साळवे यांच्या नातेवाइकांकडे तसेच बिल्डरकडेही लग्न असल्याने ते त्यात व्यस्त होते. त्यामुळे ही रक्कम द्यायची राहिली. त्यात चोरट्यांनी संधी साधत ती लांबविली.