यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील चिंचोली येथे बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर ३ मे रोजी मध्यरात्री २:३० वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. गुजरातकडून भुसावळला येत असलेली एक चारचाकी चिंचोली ते धानोरादरम्यान रस्त्यालगत पडलेल्या मोठ्या निंबाच्या झाडावर आदळली. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले असून, त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
चारचाकीत प्रवास करणारे सर्व प्रवासी गुजरात राज्यातील आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसमित्र संजय साळुंखे, विजय पाटील, पिंटू सूर्यवंशी, देवीदास पाटील, सुनील पाटील, जनार्दन कोळी, आनंदा साळुंखे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलविण्यात आले. महामार्गालगत असलेली २ झाडे कोसळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिवंत झाड अचानक रस्त्यावर पडल्यानेच हा अपघात घडल्याचा संशय आहे. या झाडांच्या अनधिकृत कत्तलीची चौकशी करून दोर्षीवर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावर झाडे तोडली जात असल्याचे तक्रार आहे.