जळगाव : प्रतिनिधी
शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात एका भरीत सेंटरनजीक तरुणासोबत वाद घालून नंतर त्याचा भोसकून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. आकाश पंडित भावसार (३०, रा. आयोध्या नगर) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. शहरात पुन्हा खुनाच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्यानगरमधील आकाश भावसार यांच्या घरी शनिवारी रात्री काही जण आले व त्यांनी आकाशविषयी विचारणा केली, परंतु त्या वेळी तो घरी सापडला नाही. त्यानंतर आकाशच्या पत्नीच्या मोबाईलवरूनच आकाश यास कॉल करून त्याची चौकशी करीत असतानाच कालिंका माता चौक परिसरात एका भरीत सेंटरवर आकाशशी काही जणांनी वाद घातला. वाद वाढत जाऊन तेथून त्याने पळ काढत तो आयोध्या नगरकडे जात असताना संशयितांनी त्याचा पाठलाग करीत धारदार शस्त्राने सपासप वार केले. त्यानंतर आकाशचा मित्र कुणाल सोनार याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले.