मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमध्ये अंतर्गत राजकारण सुरु असल्याचे सातत्याने समोर येत असतांना आता अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत, असा कांगावा करत शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठी बंडाळी झाली. त्यानंतर अनेक आमदारही हेच कारण देत त्यांच्यासोबत गेले. पण नंतर अजित पवारही महायुतीत आल्याने त्यांच्यावर दादांच्याच नेतृत्वात काम करण्याची विचित्र वेळ आली. त्यानंतर आता शिवसेनेच्या मंत्र्यांनी पुन्हा अजित पवार आमच्या खात्याचा निधी पळवतात असा धोशा लावला आहे.
संजय शिरसाट यांनी अजित पवारांवर कोणतीही पूर्वकल्पना न देता लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय खात्याचा पहिल्यांदा 3 हजार कोटी, तर आता सव्वा चारशे कोटी रुपयांचा निधी पळवल्याचा आरोप केला आहे. यामुळे महायुतीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे. विशेषतः ज्या अजित पवारांवर खापर फोडत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना धक्का देत स्वतःची वेगळी चूल मांडली, त्याच अजित पवारांमुळे आज त्यांच्या मंत्र्यांवर पुन्हा एकदा माध्यमांपुढे जाहीर नाराजी व्यक्त करण्याची वेळ आल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. चला तर मग या संपूर्ण घटनाक्रमावर एक धावती नजर टाकूयात…
संजय शिरसाट म्हणाले की, लाडकी बहीण योजनेसाठी माझ्या खात्याचा निधी वळवला आहे. मी अनेकदा सांगितले आहे की असे करता येत नाही पण तरीही निधी वळवण्यात आला आहे. जवळपास सव्वा चारशे कोटी रुपये वर्ग करण्यात आले असून याची मला काहीच कल्पना नाही. सहन करायला काही मर्यादा असते, यापेक्षाही जास्त करत असाल तर सर्वच निधी एकदाच कट करुण घ्या. सामजिक न्याय खात्याचा निधी तुम्हाला कायदेशीर रित्या वर्ग करता येत नाही, कट करता येत नाही.हे कायदेशीर नसेल आणि अर्थवाले जास्त डोकं चालवत असतील तर हे बरोबर नाही. आदिवासी खातं, सामजिक न्याय खातं कशासाठी आहे? इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाही का? परंतू हे असं करतात. लाडकी बहीण योजनेला पैसे देणे गरजेचे आहे याची कल्पना मलाही आहे. पण तुम्ही यामध्ये जातीयवाद करू शकत नाही. तुम्ही असे म्हणू शकत नाही की सामाजिक न्यायचे पैसे काढले आणि ते दलित बहीणींना दिले असे म्हणता येत नाही.
एकनाथ शिंदे यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी आम्ही महाराष्ट्रभर फिरत असताना स्थानिक आमदार राष्ट्रवादीचे मंत्री निधी देत नाही, अशी तक्रार करतात, पहिले आम्ही विरोधात होतो तेव्हा बोलता येत होते पण आता सत्तेत असल्याने बोलता येत नाही असे म्हटले होते.
2023 मध्ये संजय शिरसाट यांनीच माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, मविआच्या काळात मी अजित पवार यांच्याकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी मला स्पष्ट शब्दात तुम्ही आमच्या पक्षाचे नाहीत, त्यामुळे मी निधी देवू शकत नाही असे सांगतिले होते. तर अजित पवारांना निधी वाटपावरून अनेक पत्रे दिली आहेत. एका आमदाराची पन्नास पन्नास पत्रे तिथे असतील. ती ही तपासून पहावीत. त्यावर कारवाई झालेली नाही. तर उद्धव ठाकरे यांच्याकडे त्याबाबत व्यथा मांडल्या. मात्र त्यावरही कोणतेच आश्वासन ठाकरे यांच्याकडून न मिळाल्याचे शिरसाट यांनी म्हटले होते.