मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण व रितेश देशमुखच्या ‘रेड 2’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकला आहे. तर रितेश देशमुखने खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने दोन दिवसात कोटींचा व्यवसाय केला आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ४८ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १९.२५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. दुसऱ्या दिवशी ‘रेड-२’ चित्रपटाने ११.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे चित्रपटाचं कलेक्शन ३१ कोटी इतकं झालं आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत ‘रेड 2’चित्रपटाची दुसऱ्या दिवशीच्या कलेक्शनमध्ये घट झालेली पाहायला मिळत आहे. मात्र दोन दिवसांत या चित्रपटाने आपले अर्धे बजेट वसूल केले आहे. हा चित्रपट वीकेंडला आणखी कमाल करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज गुप्ता दिग्दर्शित रेड- २ चित्रपट २०१८ मध्ये आलेल्या रेड चित्रपटाचा सीक्वल आहे. या फ्रॅंचाईजीचा पहिला भाग यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. ‘रेड 2’ चित्रपटात अजय देवगण आणि रितेश देशमुखसोबत वाणी कपूर, रजत कपूर, सौरभ शुक्ला आणि सुप्रिया पाठक या कलाकरांचा देखील समावेश आहे.