मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील काही भागातील तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. यातच आता उकाडयाने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांमध्ये वादळी वाऱ्यांसह वीजांचा कडकडाट आणि मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातही पावसाचा तडाखा राहील असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्यात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ऑरेंज अलर्ट जारी
तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात 4 तारखेपासून ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे वाढत्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३ मे रोजी नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
येलो अलर्ट जारी
याशिवाय यवतमाळ, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर आदी भागांत येलो अलर्ट जारी आहे. या ठिकाणीविजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील बहुतांश भागात हवामान ढगाळ राहील. दरम्यान, आजपासून 5 मे या कालावधीत महाराष्ट्रातील अनेक भागांत हवामानात मोठे बदल होणार असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अवकळी पावसामुळे पिकांचे देखील नुकसान होण्याची शक्यता आहे.