जळगाव : प्रतिनिधी
ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ बिअर बार सुरू ठेवण्यासह त्या ठिकाणी सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना अरेरावी करीत धक्काबुक्की करण्यात आली. तसेच पोलिस ठाण्यात नेत असताना शासकीय वाहन अडवून तुम्ही नोकऱ्या कशा करतात ते पाहतोच, अशी पोलिसांना धमकी देण्यात आली. हा प्रकार १ मे रोजी रात्री एक वाजता आव्हाणे शिवारातील बारमध्ये घडला. या प्रकरणी दोघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, आव्हाणे शिवारात नवीन महामार्गालगत गार्गी बिअर बार या नावाचे हॉटेल असून ते ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. तसेच त्या ठिकाणी पत्त्याचा क्लब सुरू असल्याचीही माहिती मिळाली. त्यामुळे तेथे पोहेकों गुलाब माळी व प्रवीण पाटील हे कारवाईसाठी गेले होते. तेथे रावसाहेब गोपाल चौधरी (३०, रा. आव्हाणा, ता. जळगाव) याने माळी यांना अरेरावी केली तर पाटील यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर चौधरी यास पोलिस ठाण्यात नेत असताना सागर गोपाल चौधरी (२७, रा. आव्हाणा, ता. जळगाव) याने दुचाकीने पाठलाग करीत शासकीय वाहनासमोर दुचाकी आडवी लावली.