जळगाव : प्रतिनिधी
पाच दिवसांपूर्वी रबरी शिक्के देण्यासाठी शहरात आलेल्या मोहम्मद शफी मोहम्मद मोमीन (७०, रा. मंचर, जि. पुणे) यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह शुक्रवारी (२ मे) नवीन बसस्थानकाशेजारील एका हॉटेलमध्ये आढळून आला. रबरी शिक्के दिल्यानंतर ते बेपत्ता होते. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद शफी हे २८ एप्रिल रोजी न्यायालयात रबरी शिक्के देण्यासाठी आले होते. शिक्के दिल्यानंतर ते घरी परतले नाही. चार दिवस उलटले तरी त्यांचा शोध न लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांचा शोध सुरू असताना शुक्रवारी सकाळी नवीन बसस्थानकाशेजारील एका हॉटेलमधील एका खोलीत मोहम्मद शफी यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
मोहम्मद शफी यांचा मृतदेह ज्या खोलीत आढळला तिच्या दरवाजाला आतून कडी लावलेली होती. त्यामुळे घातपाताची शक्यता पोलिसांनी नाकारली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी कदाचित उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.