जळगाव : प्रतिनिधी
ही मोहीम केवळ एका खड्ड्यापुरती मर्यादित नाही, तर ती आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा संकल्प आहे, स्वच्छता म्हणजे फक्त शासकीय कार्यक्रम नाही, ती आपल्या संस्कृतीची ओळख असून सामूहिक जबाबदारीआहे. आजवर आपण घरटी शौचालय उभारून पहिला टप्पा पूर्ण केला आहे. पण आता वेळ आहे शिस्तबद्ध वापर, ओला-सुका कचरा विलगीकरण आणि त्याचे खतात रूपांतर यासाठी प्रत्यक्ष कृतीची. कंपोस्ट खड्डा हे घरातलं ‘सोनं’ आहे. यातून तयार होणारं खत हे शेतीला संजीवनी ठरेल. ग्रामस्थांनी स्वच्छतेसाठी शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
“एक खड्डा… एक संकल्प – स्वच्छ गाव, समृद्ध गाव!” या प्रेरणादायी घोषवाक्याने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत ‘कंपोस्ट खड्डा भरा – आपलं गाव स्वच्छ ठेवा’ या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नाडेफ खड्डा व कचरा विलगीकरण केंद्राचे लोकार्पण करून शिरसोली येथे करण्यात आला. शिरसोली प्र.न. मराठी शाळा येथे झालेल्या या कार्यक्रमात मान्यवरांनी गावकऱ्यांना स्वच्छतेच्या दुसऱ्या टप्प्याचा संकल्प करून कृतीशील होण्याचे आवाहन केले.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सेवाभावी कार्याचा विशेष उल्लेख करत सांगितले की, “त्यांच्या प्रयत्नामुळे स्वच्छता हे जनआंदोलन बनले आहे. त्यांच्या अनुयायांचा या अभियानात मोठा सहभाग राहिला आहे. तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांच मोलाचे योगदान लाभले असून भविष्यातही राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उत्कृष्ट खतनिर्मितीची संधी – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “कंपोस्ट खड्ड्यातून उत्तम मूल्य असलेले जैविक खत तयार करता येते, जे पर्यावरणपूरक व आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर आहे.” त्यांनी स्वच्छतेची शपथ कागदावर न राहता कृतीत उतरवण्याचे आवाहनही केले. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक डॉ. सचिन पानझडे यांनी केले. सूत्रसंचालन क्षमता बांधणी तज्ञ मनोहर सोनवणे यांनी तर आभार गटविकास अधिकारी सतीश धस यांनी मानले. यावेळी प्रसंगी जिल्हाप्रमुख व माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी सभापती नंदूआबा पाटील, प्रकल्प संचालक डॉ. सचिन पानझडे, गटविकास अधिकारी सतीश धस, सरपंच हिलाल भील, उपसरपंच द्वारकाबाई बोबडे, माजी सरपंच अनिल पाटील, रामकृष्ण काटोले, दुध संघाचे संचालक रमेशअप्पा पाटील, ग्रा.पं. सदस्य गौतम खरे, मुदस्सर पिंजारी, श्याम कोगटा, युवसेनेचे रोहित कोगटा, विस्तार अधिकारी राजेश इंगळे, ग्रामसेवक चिंचोरे, संवादतज्ञ निलेश रायपूरकर, समाजशास्त्रज्ञ भीमराव सूरदास, समूह समन्वयक शिरीष तायडे यांच्यासह शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.