मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. जालना येथून बीड दौऱ्यावर जात असताना त्यांना रस्त्यातच भोवळ आली. त्यामुळे बीड येथील दौरा सोडून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांच्या मराठवाड्यात सातत्याने बैठका सुरू आहेत. याच दरम्यान जालना येथील बैठक झाल्यानंतर ते बीड कडे जात असताना मार्गामध्ये त्यांना भोवळ आली. त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांना उष्माघात म्हणजेच सनस्ट्रोक आणि अतिसाराचा त्रास होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसेच पुढील काही दिवस त्यांना विश्रांतीचा सल्ला देखील डॉ. विनोद तावरे यांनी दिला आहे. मराठवाड्यामध्ये सध्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात नागरिकांना दुपारच्या वेळी बाहेर न पडण्याचा सल्ला देखील देण्यात येत आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील यांना देखील उष्माघाताचा फटका बसला असल्याचे सांगितले जात आहे.
केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत देशभरात होत असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मात्र अशा जनगणनेची कोणतीही गरज नसल्याची विरोधाभासी प्रतिक्रिया दिली आहे. जातीनिहाय जनगणना करण्याची काहीच गरज नाही. सरकारने बांठिया आयोगाचा अहवाल लागू केला तरी पुरेसे आहे. पण सरकारची इच्छा असेल, तर आमचा विरोध नाही, असे ते म्हणाले. या प्रकरणी त्यांनी आरक्षणाची कमाल मर्यादा 72 टक्के करण्याचीही मागणी केली आहे.