जळगाव : प्रतिनिधी
मुंबई बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये १ ते ४ मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेली ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’ (वेव्हज) ही परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी एक प्रभावी मंच ठरणार असून, मुंबईसारख्या महानगराला जागतिक स्तरावर या क्षेत्राचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त होईल, असा विश्वास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने देश-विदेशातील चित्रपट, दूरचित्रवाणी, ओटीटी, अॅनिमेशन, गेमिंग आणि मिडिया या क्षेत्रांतील नामवंत प्रतिनिधी एकत्र येत असून, या परिषदेमुळे उद्योग, रोजगार व नव्या कल्पनांना चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन होणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब असून, देशातील सर्जनशीलतेचा आणि तंत्रज्ञानाच्या आधारे उभ्या राहणाऱ्या नव्या भारताचा चेहरा या व्यासपीठावरून जगापुढे सादर होईल, असेही पाटील यांनी सांगितले.
या परिषदेमुळे मुंबई ही फक्त देशाची नव्हे तर संपूर्ण जगातील ऑडिओ-व्हिज्युअल क्षेत्रातील महत्त्वाची राजधानी म्हणून ओळखली जाईल. राज्य शासनाने या क्षेत्रात गुंतवणूक, सुविधा आणि कौशल्य विकासासाठी जे धोरणात्मक निर्णय घेतले आहेत, त्याला अशा परिषदा बळकटी देतात, असेही ते म्हणाले.
‘वेव्हज’ परिषदेच्या आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व संबंधित विभागांना आणि आयोजकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या असून, या उपक्रमाचा राज्याच्या प्रगतीत मोलाचा वाटा उरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.