चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरात गस्त सुरु असतांना चाळीसगाव पोलिसांनी मालेगाव चौफुलीवरुन जात असलेल्या वाहनाची तपासणी केली. या वाहनात त्यांना २० लाख ६९ हजार रुपये किंमतीचा ४२ किलो ५८३ ग्रॅम गांजा मिळून आला. याप्रकरणी मालेगावच्या कार चालकाला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा सापडल्याने एकच खळबळ उडाली असून घटनेच्या तपासासाठी पोलीसांचे पथक रवाना झाले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अरूण बाविस्कर, पोलीस कर्मचारी राहूल सोनवणे, आशुतोष सोनवणे, रविंद्र बच्छे, राकेश महाजन, ज्ञानेश्वर पाटोळे, दीपक चौधरी हे बुधवारी सकाळच्या सुमारास गस्त घालीत होते. यावेळी त्यांनी सकाळी सहा वाजेच्या सुमारास मालेगाव रस्त्यावर धुळे ते छत्रपती संभाजीनगर हायवे बायपास चौफुलीवर कन्नडकडून मालेगावकडे जाणारी (एमएच १२, केएन २३०५) क्रमांकाची कार थांबवली. त्यांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये पॅकींगचे गुंडाळलेले गड्ढे दिसून आले. त्यातून अंमली पदार्थसारखा (गांजा) वास येवू लागल्याने ही माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडे यांना दिली. याप्रकरणी कार चालक शेख नदीम शेख बशीर शेख याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला एनडीपीएस अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी स्वतः तपास करीत आहेत. कारमध्ये सापडलेला लाखो रूपये किंमतीचा गांजा कारचालक कुठून आणून कुठे सप्लाय करीत होता. याचा खोलवर तपास पोलीस करीत असून चौकशीसाठी पथक देखील रवाना झाल्याचे सांगण्यात येते. अंमली पदार्थ तस्करीच्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.