गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात शरद पवार पक्षाला मोठे धक्के बसत असतांना आता जळगाव जिल्ह्यात देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे दोन माजी मंत्री डॉ. सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. माजी मंत्री डॉ. सतीश पाटील हे २ मे रोजी, तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त मंगळवारी होणाऱ्या एका बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.
गुलाबराव देवकर यांच्यासोबत दोन माजी आमदार, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका यांच्यासह अनेक मोठे पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या संभाव्य राजकीय बदलामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन्ही नेत्यांचा औपचारिक पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.
डॉ. सतीश पाटील यांनी मंगळवारी पारोळा एरंडोल तालुक्यातील कार्यकर्त्यांचीही बैठक बोलावली आहे, तर पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या उपस्थितीत गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील, तिल्लोतमा पाटील यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत देवकर यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जळगाव जिल्ह्यात मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले होते. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने, अनेक कार्यकर्ते, सत्ताधारी गटात असणेच फायदेशीर आहे असं मानू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे.