सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरातून खुनाच्या घटना समोर येत असतांना आता एक खळबळजनक घटना मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी येथून समोर आली आहे. पत्नीस नांदवण्यास पाठवण्याच्या वादातून जावयाने धारदार शस्त्राने हल्ला करुन सास-याचा खून केल्याची घटना घडली. वडिलांचा वाचवण्याचा प्रयत्न करणा-या मेहुण्यासह सासूवरही हल्ला केल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवार, २७ एप्रिल रोजी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान आरोपी मंगेश देविदास सलगर (वय ३५, रा. लक्ष्मीनगर, कोळेगाव) याने पोलिस हेल्पलाईन ११२ वर कॉल करुन मदत मागितल्याचा प्रकारही समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक बापूराव मासाळ (२४) यांनी मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपी मंगेश सलगर (३५, रा. लक्ष्मीनगर, कोळेगाव) याने पत्नी त्याच्याकडे नांदण्यास न येण्याच्या रागातून, तसेच न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर राग मनात धरून सासरे बापूराव मासाळ यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. रविवारी रात्री अभिषेक मासाळ हे घराच्या शेजारील गोठ्यात झोपले होते. वडिलांवर हल्ला होत असल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी गेला असता आरोपीने मेव्हणा व सासूवर हल्ला केला. जखमींना सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार गेल्या काही काळापासून आरोपी मंगेश सलगर याने सासऱ्याकडे पत्नीला नांदण्यासाठी पाठवण्याबद्दल पाठपुरावा सुरू केला होता. मात्र त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने तो संतापला होता.
या माहितीवरून पोलिस उपनिरीक्षक केसरकर, पोलिस हवालदार पवार हे रामहिंगणी येथे रवाना झाले. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आजूबाजूच्या लोकांकडून माहिती घेतली असता सासरा, मेव्हणा व सासूवर हल्ला करून स्वतःवर आरोपीने जखमा केल्याचे समोर आले. आरोपीस तातडीने पोलिस सुरक्षेत मोहोळ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील करीत आहेत.