जळगाव : प्रतिनिधी
पारोळानजीक एप्रिल २००९ मध्ये झालेल्या सावित्री फटाका कारखान्यातील स्फोटात २४ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पारोळा येथील दोन माजी नगराध्यक्षांसह तीन जणांना दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. सहा जणांना निर्दोष सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे या खटल्यात ३८ साक्षीदार फितूर झाले आहेत. अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश छाया पाटील यांनी सोमवार दि.२८ रोजी हा निकाल दिला. माजी नगराध्यक्ष गोविंद एकनाथ शिरोळे, त्यांचा भाऊ चंद्रकात एकनाथ शिरोळे, चंद्रकांत यांच्या पत्नी व माजी नगराध्यक्षा मनीषा शिरोळे या तीन जणांचा शिक्षा झालेल्यांमध्ये समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा-अमळनेर रस्त्यावरील सावित्री फायर वर्क्स फॅक्टरीत १० एप्रिल २००९ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास स्फोट होऊन आग लागली होती. यात सहा बालके, नऊ महिला आणि नऊ पुरुष अशा २४ जणांचा बळी गेला होता तर तब्बल ४४ जण जखमी झाले होते. याबाबत पारोळा पोलिसात वरील तीन मालकांसह ९ जणांवर मृत्यूस कारणीभूत व स्फोटक पदार्थांच्या बाबतीत बेजबाबदारपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमळनेर न्यायालयात एकूण ४२ साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यात एकूण ३८ साक्षीदार फितूर झाले होते. न्या. छाया पाटील यांनी फिर्यादी पोलिस उपनिरीक्षक शरद घुगे, डॉ. योगेश पवार, तपासी अधिकारी प्रकाश हाके, तत्कालीन नायब तहसीलदार लालचंद नगराळे यांची साक्ष ग्राह्य धरून फॅक्टरी मालक गोविंद शिरोळे, चंद्रकांत शिरोळे व मनीषा चंद्रकांत शिरोळे या तिघांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा तसेच स्फोटक कायदा कलम २ (ब) प्रमाणे २ वर्षांचा कारावास अशी शिक्षा आणि अनुक्रमे १० हजार व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. सरकार पक्षातर्फे अॅड. राजेंद्र चौधरी यांनी काम पाहिले.