जळगाव : प्रतिनिधी
माझ्याने आता सहन होत नाही जानू असे वाक्य लिहून तरुणीसोबतचा फोटो इन्टाग्रामवर स्टोरी ठेवत सतिष बाविस्कर (वय २२) या तरुणाने आत्महत्या केली. हा तरुण ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत होता, त्याच नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात त्याने जीवनयात्रा संपविली. ही घटना रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील आशाबाबा नगरात राहणारे रामचंद्र पाटील हे नूतन मराठा महाविद्यालयात प्लंबिंग काम करण्यासाठी रविवारी सकाळी गेले होते. महाविद्यालयाच्या आवारातील स्वच्छतागृहाजवळ एका चिंचेच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक जण दिसला. त्यांनी लागलीच घटनेची माहिती महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकाला दिली. घटना समजाच अनेकांनी महाविद्यालयाच्या आवारात गर्दी केली होती, अनेक जण स्वच्छतागृहाकडे जात होते. त्यांना पाटील यांनी तिकडे जाण्यापासून रोखले. या घटनेची माहिती जिल्हापेठ पोलीसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक उल्हास चहाटे, पोहेकॉ अनिता वाघमारे, जयेश मोरे, विशाल साळुंखे हे तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी झाडाला गळफास घेतलेल्या तरुणाचा मृतदेह खाली उतरवून त्या विद्यार्थ्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.
गळफास घेतलेल्या तरुणाची ओळख पटत नसल्याने सुरुवातीला पोलिसांनी अनोळखी म्हणून पोलिसात नोंद घेतली. मात्र त्यानंतर घटनेची माहिती शहरात परताच सतिषचे मित्र जिल्हा रुग्णालयात आले. त्यांनी सतिषचा मृतदेह बघून त्याची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनीही महाविद्यालयाकडून माहिती घेतली असता मयताचे नाव सतीश बाविस्कर असल्याचे समजले.