चोपडा : प्रतिनिधी
दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या स्वतःच्या मुलीवरच सीआरपीएफच्या निवृत्त जवानाने गोळी झाडून तिचा खून केला. या गोळीबारात जावईही गंभीर जखमी झाला. तर, घटनेनंतर जमावाने केलेल्या मारहाणीत सासराही जखमी झाला. गोळीबाराची ही थरारक घटना चोपडा शहरातील डॉ आंबेडकर नगरात शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर लोकांनी या निवृत्त जवानाला मारहाण केली. यात तोही गंभीर जखमी झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तृप्ती अविनाश वाघ (२४) असे मृत कन्येचे नाव आहे. तृप्ती हिने दोन वर्षापूर्वी अविनाश ईश्वर वाघ (२८, दोघे रा. करवंद, शिरपूर, ह. मु. कोथरूड, पुणे) याच्याशी प्रेमविवाह केला होता. आरोपी सासरा किरण अर्जुन मंगले (४८, रा. शिरपूर) याला हा विवाह पसंत नव्हता. बहिणीकडील विवाह समारंभासाठी अविनाश आणि तृप्ती हे शनिवारी सायंकाळी चोपड्यात आले होते. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर किरण व तृप्ती हे समोरासमोर आले. तृप्ती हिला पाहताच किरण याने त्याच्याकडील रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली. तिला वाचविण्यासाठी अविनाश गेला असता तोही गोळी लागून जबर जखमी झाला. अविनाश याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगावला हलविण्यात आले आहे. नातेवाइकांनी किरण मंगले यास मारहाण केली. दरम्यान, शनिवारी रात्री १२:१५ वाजेच्या सुमारास जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी चोपड्यात जाऊन घटनेची माहिती घेतली.