अमळनेर : प्रतिनिधी
घरगुती वापराच्या सिलिंडरचा बेकायदेशीर साठा करून तो गॅस खासगी वाहनात भरण्याचा व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल ३८ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील श्रीकृष्ण कॉलनीतील खुल्या जागेत घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करून वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी १७ रोजी रात्री ७:४५ वाजता घटनास्थळी छापा टाकला असता त्यांना वाहनात इलेक्ट्रिक पंपाद्वारे घरगुती सिलिंडरमध्ये गॅस भरला जात असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी धनंजय प्रभाकर पाटील (४८, श्रीकृष्ण कॉलनी) आणि अमोल सुभाष बोरसे (३७, धार, ता. अमळनेर) या दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याजवळून १ लाख ५० हजार रुपयांची चारचाकी, ८ हजार रुपयांचे ४ सीलबंद सिलिंडर, ११ हजार रुपये किमतीचे ११ रिकामे सिलिंडर, ३ हजार रुपये किमतीचे दुसऱ्या कंपनीचे ३ रिकामे सिलिंडर, २० हजार रुपये किमतीचा गॅस भरण्याचा इलेक्ट्रिक पंप व नळ्या जप्त केल्या.
२२ रोजी दुपारी १२ वाजता पाचपावली मंदिर परिसरात जयदीप ऑटो गॅरेज मागे दोघे तेच उद्योग करीत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकून जयेश संजय साळी (२७, शिरूड नाका अमळनेर), चंदन प्रल्हाद साळी (४५, रामेश्वर नगर शिरूड नाका) यांना रंगेहात पकडले. त्यांच्याजवळून १४ हजार रुपये किमतीचे ७ भरलेले गॅस सिलिंडर, ६ हजार रुपये किमतीचे रिकामे सिलिंडर, १० हजार रुपये किमतीचे दुसऱ्या कंपनीचे १० रिकामे सिलिंडर, १० हजार रुपये किमतीचा गॅस भरण्याचा इलेक्ट्रिक पंप असे ४० हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, प्रशांत पाटील, विनोद संदानशीव, उज्ज्वल म्हसके, नितीन कापडणे यांनी केली. या गॅसचा वापर वाहनात भरण्यासाठी केला जात असल्याने अनेक निष्पापांचा जीव जाण्याची भीती व्यक्त होत आहे