जळगाव : प्रतिनिधी
शहरातील वाल्मीक नगर भागात इलेक्ट्रिक फॅन दुरुस्ती करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने महेश राजेंद्र तायडे (वय २५, रा. वाल्मीक नगर, पक्की चाळ) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मीक नगर परिसरामध्ये शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घरातील लाईट गेली होती. त्यावेळी महेश तायडे हा घरातील फॅन दुरुस्ती करत होता. अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसून त्याचा जागेवरच मृत्यू झाला. शेजाऱ्यांनी त्याला तत्काळ जीएमसीत दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मयत घोषित केले.