जळगाव : प्रतिनिधी
शिरसोली रस्त्यावरील लाकडापासून ठोकळे बनविणाऱ्या सनी ट्रेडर्स या कंपनीला शुक्रवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. कंपनीत लाकडी भुसा, कोरडे लाकूड मोठ्या प्रमाणात असल्याने, काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले. या भीषण आगीमध्ये कंपनीतील लाकडी ठोकळे, उभे असलेले ट्रॅक्टर आणि इतर साहित्य जळून खाक झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच मनपा अग्निशमन विभागाचे बंब, जैन कंपनीचे बंब घटनास्थळावर पोहोचले. कोरड्या लाकडामुळे आग वाढतच जात होती. त्यात हवेचाही वेग असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन विभागाच्या जवानांनाही मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या. या आगीत कंपनीतील लाकडी ठोकळे आणि इतर साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार, या आगीत आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीच्या तडाख्यात कंपनीच्या परिसरात उभा असलेला एक ट्रॅक्टरदेखील पूर्णपणे जळून गेला आहे. तब्बल दोन तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. यासाठी सात ते आठ अग्निशमन विभागाच्या बंबाचा वापर करण्यात आला.



