जळगाव : प्रतिनिधी
भुसावळ येथे ड्युटीला जाणाऱ्या आरपीएफ कर्मचाऱ्याच्या दुचाकीला मागून आलेल्या ट्रकने धडक दिल्यामुळे हा कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजता तरसोदलगतच्या महामार्गाजवळ घडली. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, दिलीप पुना बारी (वय ४५, मूळ रा. शिरसोली, सध्या वास्तव्य रायसोनीनगर) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते गुरुवारी सकाळी ९:३० वाजता भुसावळ येथे ड्युटीवर जाण्यासाठी निघाले. तरसोदजवळ मागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत बारी हे रस्त्यालगत पडले, त्यात त्यांच्या हाताला व डोक्यालाही जबर मार लागला. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी प्राथमिक तपासणी करून, खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान वाढत्या अपघातामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.